प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज
राज्यामध्ये फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीस चालना मिळावी या उद्देशाने फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्थांकडे प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेजेस उभे करुन तापमान व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास कृषि पणन मंडळाने सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले आहे. कृषि पणन मंडळाने तंत्रज्ञानाची निवड, तंत्रज्ञानाची आयात करणे, प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज उभारणीचे नियोजन व अंमलबजावणी करणे यासाठीची संपूर्ण जबाबदारी घेतलेली होती. यानंतर महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सहकारी संस्थांमधून प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. कृषि पणन मंडळाच्या या पायाभूत प्रयत्नांमुळेच आज महाराष्ट्र संपूर्ण देशामधील सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारे राज्य ठरले आहे. तसेच देशामधून होणाऱ्या फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा 70 टक्के आहे. या सुविधांचा अवलंब करुन राज्यातून डाळिंब व आंबा यांचीही यशस्वी निर्यात झालेली आहे. या योगदानामुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली आहे. आज ही सुविधा केंद्रे व्यवस्थित कार्यरत राहतील हे वेळोवेळी पाहण्याइतपत पणन मंडळाचे कार्य मर्यादित आहे. पणन मंडळाने सध्या अस्तित्वात असलेल्या प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज सुविधा केंद्रांची कार्यरतता तपासणीच्या दृष्टीने सर्व्हे करुन क्षमतेचा अधिक वापर, आर्थिक सक्षमता व कायक्षमते मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने योग्य धोरण काय असावे याबाबत सुचना केलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने यापुर्वी राज्यातील सहकारी क्षेत्रातील 32 प्रिकुलिंग व कोल्ड स्टोरेज सुविधा केंद्रांना मार्गदर्शन केलेले आहे. यापैकी बहुतांशी शितगृहामधुन द्राक्ष निर्य़ात करणेत आली आहे.
कोल्ड स्टोरेज उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी केलेले प्रयत्न
- भारत सरकारने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीच्या निष्कर्षानुसार (1998) देशामध्ये 12 लाख मे.टन अधिक कोल्ड स्टोरेज क्षमतेची आवश्यकता आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कोल्ड स्टोरेज सुविधांचे विस्तारीकरण, दुरुस्ती व अत्याधुनिकीकरण करुन आणखी 8 लाख मे.टन क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. यास अनुसरुन महाराष्ट्र शासन राज्यामध्ये अधिक कोल्ड स्टोरेज क्षमता उभारणीच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
- कृषि पणन संचालनालय व कृषि पणन मंडळ राज्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी प्रयत्नशील आहे.
- राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या व शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजची उभारणी करण्यासाठी कृषि पणन मंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
कोल्ड स्टोरेज उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळाने उभे केलेले प्रकल्प
- पणन मंडळाने अपेडा नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनें अंतर्गत राज्यात कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था तसेच इतर संस्था यांचेकडुन जागा प्राप्त करुन घेवुन राज्यात 20 ठिकाणी निर्यात सुविधा केंद्रे उभारली असुन त्यापैकी 2 सुविधा केंद्रांचे काम अंति टप्प्यात आहे. या निर्यात सुविधा केंद्रामध्ये प्रशितगृह, शीतगृह, पॅक हाउस व काही ठिकाणी पिकवण गृह यांचा समावेश आहे.
- तसेच राज्यात फळे भाजीपाला करीता 20 मॉडर्न मार्केटींग सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.
- या सुविधा केंद्राची उभारणी पूर्ण झालेली असून या सुविधा पणन मंडळाकडे हस्तांतरीत झालेल्या आहेत.
- राज्यातील फुले निर्यातीला चालना मिळणेसाठी 3 ठिकाणी फुले निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यापैकी 2 सुविधा केंद्रांची उभारणी पूर्ण झालेली असून एका सुविधा केंद्राचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.