-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

निर्यातदार व्हा !

राज्यातील प्रगतशील व इच्छूक शेतकरी, उद्योजक यांना निर्यातदार करण्यासाठी आयात- निर्यात परवाना व अपेडा नोंदणी यासाठी मार्गदर्शन - मंडळाच्या निर्यात विभागामार्फत शेतकरी, उद्योजक यांनी निर्यातीमधे उतरावे यासाठी निर्यात विभागामार्फत उद्योजकता विकासाठी आयात-निर्यात परवाना व अपेडा मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुमारे सन 2003 पासून सुरू करण्यात आला आहे.

निर्यात सल्ला व सेवा सुधारीत दर आयात निर्यात परवाना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ मार्गदर्शन करते. आयात निर्यात परवान्यासाठी पणन मंडळामार्फत 1000/- ( अधिक जीएसटी कर) एवढी सल्ला फी आकारण्यात येते. त्यासाठी पणन मंडळाच्या export@msamb.com या इमेल आय.डी. वर ई-मेल केल्यास आवश्यक ती सर्व माहिती ई-मेलद्वारे देणेत येते.

निर्यातीविषयी महत्वाच्या बाबी

फर्म / संस्थेची स्थापना -कृषिमालाची निर्यात करण्यासाठी आयात-निर्यात परवाना अत्यावश्यक आहे. सदरचा आयात-निर्यात परवाना काढण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या प्रोप्रायटरी / भागीदारी /प्राईव्हेट लिमिटेड / पब्लिक लिमिटेड / सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी अथवा ट्रस्ट इ. प्रकारच्या संस्थेची संबंधित विभागांकडे नोदणी करावी. राष्ट्रीयकृत / अंकित सहकारी किंवा बहुराष्ट्रीय बँकेमधे संस्थेच्या नावाचे चालू स्वरूपाचे खाते उघडावे लागते. हा परवाना वैयक्तिक नावावरही प्राप्त होऊ शकतो.

आयात - निर्यात परवाना (IEC) - आयात-निर्यात परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यासाठी खालील लिंक नुसार दिलेल्या सुचनांनुसार अर्जदाराने अर्ज करावा.
संकेतस्थळ – http://dgft.gov.in/exim/2000/iec_anf/ieconlnapplform.htm

महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सहसंचालक विदेश व्यापार, यांच्या कार्यालयांचे पत्ते खालीलप्रमाणे.

अ)सहसंचालक विदेश व्यापार,

सी-ब्लॉक, आयकरभवन,
दुसरा मजला, पी.एम.टी. वर्कशॉप जवळ,
स्वारगेट, पुणे
संबंधित जिल्हे- पुणे, अहमदनगर, जालना, बीड, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग व नाशिक

ब) सहसंचालक, विदेश व्यापार, भारत सरकार

नवीन सचिवालय इमारत-1, पूर्व भाग,
पहिला मजला, व्ही.सी.ए. मैदानासमोर,
सिव्हील लाईन्स, नागपूर-440 001
दूरध्वनी – 0712-2541256
फॅक्स- 0712-2541451
ई-मेल:nagpur-dgft@nic.in

संबंधित जिल्हे-अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ

क)सहसंचालक विदेश व्यापार,

नवीन सी.जी.ओ. इमारत,
नवीन मरिन लाईन्स,
चर्चगेट, मुंबई - 400 020
दूरध्वनी-022-22017716 / 22016421
फॅक्स – 022-22063438
ई-मेल:mumbai-dgft@nic.in

संबंधित जिल्हे-राज्यातील इतर उर्वरित सर्व जिल्हे

निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी (RCMC)-आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यावर निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र आवश्यक असते. कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांचे वेबसाईटच्या द्वारे ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करता येते.

कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात बिकास प्राधिकरण
विभागीय कार्यालय-मुंबई , बँकींग कॉम्प्लेक्स बिल्डींग,
चौथा मजला, सेक्टर 19 अ, वाशी,नवी मुंबई-400 705
दूरध्वनी : 022 2784 0949
www.apeda.gov.in

नोंदणीसाठी अपेडा रू. 5,000/- एवढी फी (अधिक जीएसटी) आकारते व नोंदणी मार्गदर्शनासाठी पणन मंडळ रू. 500/- (अधिक जीएसटी ) एवढी फी आकारते.

आयातदार कसा शोधावा :-

विविध माध्यमातून आयातदार शोधता येतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे काही मार्ग उपलब्ध आहेत.

  • अपेडाचे ट्रेड लिड्स
  • इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन
  • मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर
  • आंतरराष्ट्रीय प्रदर्शने

आयातदारांची यादी प्राप्त झाल्यावर आयातदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्या आयातदाराला आपल्याकडे निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या कृषिमालाची, प्रमाणाची, हंगामाची इत्यादी सर्व माहिती ई-मेल अथवा फॅक्सद्वारे पाठवावी. त्याचा प्रतिसाद प्राप्त झाल्यावर इच्छुक आयातदारांसोबत पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे पुढील चर्चा करणे, त्याला आवश्यक असलेल्या मालाचे नमूने पाठविणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

बहुतांशी कृषिमालाच्या निर्यातीमध्ये आयातदाराकडून कोणत्याही प्रकारची एल.सी. (लेटर ऑफ क्रेडीट) प्राप्त होत नाही. सदरच्या मालाची आयात ही निश्चित दराने अथवा कन्साईनमेंट (विक्री होईल त्या दराने व्यवहार या तत्वावर) बेसिसवर केली जाते व मालाची विक्री केल्यानंतर कमिशन आणि इतर अनुषंगिक खर्चाची वजावट करून उर्वरित रक्कम आयातदाराकडून निर्यातदारास पाठविली जाते.त्यामुळे कोणत्याही प्रकारची लहान /मोठी निर्यात करण्यापुर्वी आयातदाराची बाजारातील पत तपासणे आवश्यक असते. जेणेकरून आयातदाराकडून फसवणूकीचे अथवा लुबाडणूकीचे प्रकार होणार नाहीत. आयातदारांची पत तपासण्याचे काम डन अँड ब्रॅडस्ट्रीट यासारख्या खाजगी व एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.यासारख्या शासकीय संस्थांकडून करण्यात येते. संपर्कासाठी वेबसाईट www.ecgc.in तसेच एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचेकडे आपण निर्यात मालाचा विमा उतरू शकतो. काही कारणांमुळे आयातदाराकडून रक्कम प्राप्त न झाल्यास ई.सी.जी.सी. मार्फत दावा दाखल करू शकतो. वैयक्तिक स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोर्टकचेऱ्या करणे अवघड जाते.

कृषिमालाच्या निर्यातीपूर्वी ज्या आयातदाराला व ज्या देशात कृषिमालाची निर्यात करावयाची आहे त्या देशामध्ये आवश्यक असलेली गुणवत्ता, पॅकींग, दर इत्यादीबाबतची माहिती आयातदाराकडून प्राप्त करून घ्यावी व त्या गुणवत्तेच्याच मालाची निर्यात करण्यात यावी.निर्यातीपूर्वी मालाच्या विक्री दरांबाबतची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून निर्यात करण्यात येणाऱ्या मालाच्या विक्री रक्कमेमधून निर्यातीच्या खर्चाच्या रक्कमेची वजावट केल्यास व्यवहारामध्ये होणाऱ्या संभाव्य फायदा /तोट्याची माहिती मिळू शकेल.त्याचबरोबर निर्यातीबाबतची सर्व कागदपत्रे तयार करणे, विमानामध्ये जागा आरक्षित करणे, कस्टम क्लिअरन्स करणे यासाठी क्लिअरींग अँड फॉरवर्डींग एजन्टची (सी.एच.ए.) आवश्यकता असते. अशा प्रकारचे एजन्ट्स मुंबई /पुण्यामधे उपलब्ध असतात. सदरच्या कामासाठी चांगल्या सी.एच.ए. ची नियुक्ती करणे आवश्यक असते. वेगवेगळ्या सी.एच.ए.चे पत्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून उपलब्ध होऊ शकतात.

विमानमार्गे निर्यातीबरोबरच कृषिमालाची समुद्रमार्गेसुद्धा निर्यात केली जाते.उत्पादनांची जवळच्या देशांमध्ये निर्यात करावयाची असल्यास ४० फूटी अथवा २० फूटी कंटेनरचा वापर करण्यात येतो. लांबच्या देशांमधे डाळिंब, आंबा, द्राक्षे, यासारख्या नाशवंत कृषिमालाची निर्यात करावयाची झाल्यास वाहतुकीचा कालावधी जास्त असल्याने त्यासाठी रिफर / सी. ए. / एम.ए. (कंट्रोल्ड / मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर) कंटेनरचा वापर करण्यात येतो. तांदूळ, इंजिनिअरींग उत्पादने अशा प्रकारच्या अनाशवंत मालाची निर्यात ड्राय कंटेनरद्वारे करण्यात येते. त्याचबरोबर विविध उत्पादनांसाठी आवश्यकतेनुसार कंटेनर उपलब्ध होऊ शकतात.

आयातदाराकडून मालाची विक्री रक्कम परकीय चलनामधे आपल्या बँकेमधे जमा करण्यात येते.सदर परकीय चलनाचे रूपयामधे रूपांतर होऊन त्यानंतर सदरची रक्कम निर्यातदाराच्या खात्यामधे जमा करण्यात येते.विक्रीची रक्कम लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने बँकेच्या ज्या शाखेमधे परकीय चलन विनिमयाचे व्यवहार केले जातात अशा बँकेतच खाते उघडणे आवश्यक व सोईस्कर असते.आयातदाराकडून काही कारणांमुळे रक्कम प्राप्त होण्यात अडचणी येत असल्यास ई.सी.जी.सी. अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीची मदत घेता येते.